पालघर - जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभारदेखील समोर आला आहे. बोईसर-पालघर रस्त्यावरील जिल्हा मुख्यालयाजवळ असलेला रस्ता पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
रस्ता गेला वाहून, वाहतूक ठप्प
पालघर - बोईसर या मुख्य रस्त्यावर असलेल्या जिल्हा मुख्यालयाजवळील लहान पूल पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला आहे. त्यामुळे दिवसभर या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. जिल्हा मुख्यालयासमोरील पुलाचे काम सुरू असल्यामुळे हा तात्पुरता रस्ता बनवण्यात आला होता. मात्र पावसामुळे रस्ताच वाहून गेला आहे. त्यामुळे पालघर शहराला जोडणारा मुख्य रस्ता बंद झाला. परिणामी प्रवासी आणि वाहनचालकांचे मोठे हाल झाले. पालघर- बोईसर मुख्य रस्ता बंद झाल्याने आता वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.
'अधिकारी-ठेकेदारांच्या हातमिळवणीमुळे निकृष्ट कामे?'
पालघर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून रस्त्यांची कामे केली जात आहेत. तरीही ती कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या हातमिळवणीमुळे ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते पहिल्याच पावसात धुऊन गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
हेही वाचा - पावसाच्या साचलेल्या पाण्यात अडकून पडल्याने बेस्टच्या ५० बसेस नादुरुस्त