पालघर / वसई - लॉकडाऊनमध्ये सध्या माणसांच्या खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. त्यामुळे नियमित स्वरूपात माणसांनी दिलेल्या पदार्थांवर अवलंबून असलेल्या रस्त्यावरील श्वानांचे काय? या विचारातून नायगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नितीन म्हात्रे यांनी श्वानांची खाण्यापिण्याची सोय केली आहे.
सलग गेल्या १९ दिवसांपासून नायगाव येथील रस्त्यांवरील श्वानांच्या खाण्याची सोय ते करत आहेत. घरचे जेवण, पिल्लांसाठी दूध व बिस्कीट अशी व्यवस्था म्हात्रे यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भुकेल्या प्राण्यांसाठी केली आहे. कोरोना विषाणूमुळे मानवी जीवनावर ओढवलेले संकट प्रसारमाध्यमांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर ठिकठिकाणाहून मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत. अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेऊन गरजूंना जेवण, अन्नधान्य वितरित करत असल्याचे आपण पाहात आहे. मात्र, मुक्या प्राण्यांचे कोरोनामुळे पुरते हाल झाले आहेत.
वसई-विरार शहरात हजारो भटके कुत्रे आहेत. त्यांच्या पोटा-पाण्याची सोय साधारणत: हॉटेल्स, हातगाडीवाले, रेस्टॉरन्ट्समधील फेकलेले अन्न, नागरिकांनी टाकलेले शिळे अन्न इत्यादींमधून होत असते. मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत रस्त्यांवर शुकशुकाट असल्याने माणसावर अवलंबून असलेल्या प्राण्यांचे हाल झाले आहेत. शोधून भटकून अन्न सापडेना अशी परिस्थिती सध्या रस्त्यावरील भटक्या प्राण्यांवर ओढावली आहे. याच विचारातून नायगाव जूचंद्र येथील नितीन म्हात्रे यांनी भुकेल्या श्वानांसाठी आपले सहकारी हेमंत कहार यांना सोबतीला घेत लॉकडाऊन काळात अन्न पुरविण्याचे काम सुरू केले.
लॉकडाऊनपासून त्यांच्यामार्फत दररोज २५० प्राण्यांच्या जेवणाची सोय करण्यात येत आहे. यावर जूचंद्र येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नितीन म्हात्रे यांनी प्रतिकिया दिली आहे. गावातील काही सहकाऱ्यांकडून भुकेले प्राणी असलेल्या परिसराबाबत माहिती दिली जाते. त्यानुसार तिथे पोहोचून भुकेल्या प्राण्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लॉकडाऊनचा कालावधी हा वाढवला असल्यामुळे पुढचे काही दिवसही अन्नदान सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले.