पालघर - जिल्ह्यात पीपीई किट्सची कमतरता भासू नये यासाठी पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी 50 बॉक्स री-युझेबल पीपीई किट्सचे वाटप केले आहे.
हे रि-युझेबल पीपीई किट्स निर्जंतुकिकरण करून पुन्हा वापरता येणार आहेत. खासदारांनी केलेल्या या मदतीमुळे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खासदार गावित यांचे आभार मानले.
जगभरात कोरोना विषाणू संसर्गाने हाहाकार माजवला असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह, राज्यात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाशी लढणाऱ्या या योध्दांना शासनामार्फत पीपीई किटचा पुरवठा केला जात आहे. तसेच अनेक खासगी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून रुग्णालयांना पीपीई किटचे वाटप केले जात आहे.