नालासोपारा (पालघर) - तुळींज पोलिसांनी मोटारसायकल चोरणाऱ्या आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. त्यांना वसई न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील पोलीस तपास सुरू आहे.
नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोड येथील साडी कंपाउंड येथे राहणाऱ्या हार्दिक दर्जी यांची १६ डिसेंबर २०१९ ला १ लाख २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी दर्जी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास पोलीस नाईक जितेंद्र बनसोडे करत असताना त्यांना माहिती मिळाली की उत्तर प्रदेश येथील पोलिसांनी नौशाद उर्फ बादशहा निजामुद्दीन अन्सारी, किशन नरेंद्र मल्हाह निषाद, अभय तिवारी यांना मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे. यानंतर तुळींज पोलिसांच्या पथकांनी उत्तर प्रदेशात येथे जाऊन तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन तुळींज पोलीस ठाण्यात आणले व चौकशी केली असता त्यांनी नालासोपारा आचोळे रोड येथून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक लाख २० हजार किमतीची मोटारसायकल जप्त केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतरच; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण