पालघर- वसई पूर्व येथील मिठाआगाराजवळील गावाला मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठा फटका बसला आहे. वसईत मिठागरात 200 तर साराजमोरी येथे 100 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. यापैकी एनडीआरएफच्या पथकाने वसई मिठागरातून 50 जणांची सुटका केली होती. तर भाताने येथून 20 ते 25 जणांची सुटका करण्यात आली. तसेच वसई वालीव पोलीस ठाणे हद्दीतील मोरी गावातील 139 लोकांना वाचवण्यात यश आले आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून दरवर्षी वसई पूर्व मिठागर पाड्यावर पावसाचे पाणी जमते. त्यामूळे येथील नागरिकांचा शहरी भागाशी चार दिवस संपर्क तुटत असतो. तेव्हा ना पालिकेला जाग येते ना लोकप्रतिनिधींना. मग आताच आमची काळजी का वाटू लागली असा प्रश्न तेथील नागरिक आता विचारू लागले आहेत.

या गावात शंभर घरे असून जवळपास तीनशे लोकवस्ती आहे. दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चार फूटांपेक्षा जास्त पाणी साचल्याने या गावाचा शहरी भागाशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. या पाड्यावर 200 लोक अडकले असल्याची माहिती तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिली. वसई पूर्व येथील कामण व चिंचोटी येथून येणारी नदी जेथे एकत्र मिळते तेथे साराजामोरी पाडा आहे. तेथे पुराचे पाणी जमा झाल्याने 100 हून अधिक नागरिक अडकले होते. तेथेही मदतकार्य सुरू आहे.

प्रजापति नावाचा एक मुलगा वाहून गेल्याची माहिती देण्यात आली आहे. शनिवारी रात्री अर्नाळा येथील खाडीपाड्यात पावसाचे पाणी 35 झोपड्यांमध्ये शिरल्यामुळे 80 ते 85 नागरिकांना सुरक्षिततरीत्या जिल्हा परिषद शाळा अर्नाळा येथे हलविण्यात आले. तसेच त्यांची जेवणाची व राहण्याची सोय करण्यात आली आहे. वसई पूर्व राजीवली, भोयदापाडा, वाघरीपाडा येथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पूर्व पट्टीतील नागले, कामण, मोरी, भाताणे येथेही एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. काही आपत्कालीन परस्थिती निर्माण झाल्यास पोलीस नियंत्रण कक्ष किंवा स्थानिक पोलीस स्थानकामध्ये कळवा असे आवाहन करण्यात आले आहे.
