पालघर - निवडणुकीतील उमेदवारांनी स्वतःची जबाबदारी म्हणून दमणगंगा- वैतरणा -गोदावरी नदीजोड प्रकल्प आपल्या अजेंड्यावर आणण्यासाठी मोखाडा भू-पाणी हक्क संघर्ष समितीने आवाहन केले असून हा प्रश्न सोडवण्यासाठीही या उमेदवारांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. यासाठी संघर्ष समितीतर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच उमेदवारांनी हा प्रश्न अजेंड्यावर घ्यावा यासाठी रॅलीदेखील काढण्यात आली. तसेच त्यासंदर्भातील फलकही मोखाड्यातील वाड्या-वस्त्यांवर लावण्यात आले आहेत.

मोखाडा समितीच्यावतीने लोकसभेकरता जनतेकडे मते मागायला येणाऱ्या उमेदवारांनी
1. दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्पला तुम्ही विरोध करतात का?
2. तुम्ही सत्तेत आलात तर हा प्रकल्प रद्द करण्यात येईल का?
3. संपूर्ण मोखाडा तालुक्याला पाणी पुरवणारी अप्पर वैतरणा पिण्याच्या पाण्याची योजना तुम्ही मंजूर कराल का ?
या प्रश्नांची लेखी उत्तरे द्यावीत, असे फलक मोखड्यातील गाव-पाड्यांमध्ये लावण्यात आले आहेत.
दमणगंगा- वैतरणा- गोदावरी प्रकल्पामुळे सुमारे ३ हजार २०० एकर जमीन बुडिताखाली जाणार आहे. याचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसणार आहे. वाघ, खोच, तुल्याचा पाडा, सायदे या पाच बंधाऱ्यांचे पाणी येथील तालुक्याला दिल्यास इथल्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल असे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. मात्र, ते दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याचप्रमाणे या प्रस्तावित धरणाऐवजी दुसऱ्या ठिकाणी आणि जिथे कमीत कमी जागा लागणार आहे अशा ठिकाणी ही धरणे बांधावी अशीही मागणी संघर्ष समितीने केली आहे. एकीकडे मोखाडा तालुक्यात टंचाईसदृश्य परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूने असे नदीजोड प्रकल्प म्हणून इथले पाणी इतर ठिकाणी वळवले जाईल व येथील स्थानिकांना पाण्याचा एक थेंबही मिळणार नसल्याने हा प्रकल्प आम्हाला नकोच यासाठी उमेदवारांनी प्रकल्पाला विरोध करावा असे समितीचे म्हणणे आहे.
काय आहे हा प्रस्तावित प्रकल्प-
दमणगंगा- वैतरणा- गोदावरी हा प्रस्तावित नदीजोड प्रकल्प असून या प्रकल्पाद्वारे येथील पाणी सिन्नरला नेले जाणार आहे. हे पाणी दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यातील औद्योगिकरणासाठी वापरण्यात येणार आहे. कोट्यावधीचा खर्च यासाठी अपेक्षित आहे, असे असले तरीही या नदीजोड प्रकल्पाचा फायदा येथील स्थानिकांना होणार नाही.