पालघर - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गोर-गरीब आदिवासींचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमी मार्क्सवादी पक्षाचे डहाणू विधानसभेचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी पूरग्रस्त भागात पाहणी केली. तसेच येथील नुकसानग्रस्त आदिवासींना मदत केली.
या वेळी आ. निकोले म्हणाले की, या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे ते भरून न येण्यासारखं आहे. मध्यंतरी पालघर जिल्हातील डहाणू, तलासरी भागात मुसळधार अतिपावसामुळे येथील आदिवासी बांधवाचे खूप नुकसान झाले आहे. यामुळे आम्ही सायवन, नीबापूर, बापूगाव, गागोडी, कास पाडा या गावात भेट देऊन आम्ही तेथील झालेली नुकसान बघितले. काही जणांचे घराच्या पत्र उडवून गेलेले आहेत, तर काही जण पूर्ण बेघर झालेली आहेत. महत्वाचे म्हणजे लॉककडाउन काळात बेरोजगार झालेले आदिवासी कसे तरी आपले जीवन शेती करून जगत आहेत. पण या निसर्ग आपत्तीमुळे यांचे खूप नुकसान झाले आहे.
या पिकाची पाहणी शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन डहाणू विधानसभेचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी केली होती. तर रायगड जिल्ह्यात निसर्ग वादळात जितकं नुकसान झाले होतं, त्याच्या बरोबरच पालघर जिल्हातील डहाणू व तलासरी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून येते. तर पालघर जिल्ह्याला महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांनी तात्काळ 50 कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी आमची विनंती आहे. बांधवानो, तुम्ही निराश होऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा धीरही आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी यावेळी दिला.
यावेळी नुकसानग्रस्त यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न पदार्थ आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट व चादरी वाटप करण्यात आल्या.