पालघर- संपूर्ण महाराष्ट्र महापूरामुळे दुःखाच्या सावटाखाली आहे. कोल्हापूर, सांगली आणि कराड परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, अशावेळी भाईंदरमध्ये आयोजित कजरी महोत्सवात भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी चक्क गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. यामुळे लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
या कार्यक्रमाला महापौर डिंपल मेहता, तसेच हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांनीही हजेरी लावली होती. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात पूरस्थिती असताना एका बाजूला लोक बाहेर येऊन धान्य, पाणी, जिवनावश्यक वस्तूसाठी मदतीची हाक देत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपल्या कार्यक्रमात पैशांची उधळपट्टी करण्यात गुंतलेले उत्तर भारतीय भाजप मोर्चाचे पदाधिकारी दिसत आहेत. संवेदनशीलता सोडून गाण्यावर ठुमका धरणाऱ्या या पदाधिकाऱ्यांवर पक्ष काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचे ठरेल.
भाजपच्या या कृतीचा काँग्रेस आणि मनसेने निषेध केला आहे. मीरा भाईंदरच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेले हे कृत्य काही नवीन नाही. जेव्हा वीरमरण आलेल्या मेजर कौस्तुभ राणे यांचे पार्थिव आले होते. तेव्हा सुद्धा हेच आमदार वाढदिवसाच्या पार्टीत होते, असा टोला देखील मनसेने लगावला आहे.