पालघर - येथील एम.एल.ढवळे रुग्णालयामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरसोबत रुग्णालयाच्या पंधरा वरिष्ठ डॉक्टरांनी तिचा मानसिक छळ केला आहे. याप्रकरणी महिला डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरुन १५ वरिष्ठ डॉक्टरांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा - प्रिन्स प्रकरण: महापालिका सभागृहात थर्ड पार्टी चौकशीची मागणी
प्रशिक्षणार्थी डॉक्टर ढवळे रुग्णालयात आपले शिक्षण पूर्ण करून प्रशिक्षणाचा अनुभव घेण्यासाठी दोन तीन दिवसाअगोदर येथे रुजू झाली होती. त्यानंतर ती येथे प्रशिक्षण घेत असताना वरिष्ठांसोबत आपली ओळख करून घेत असताना येथील वरिष्ठ डॉक्टरांनी तिचा गुरुवारी रात्री छळ केला. यामुळे तिला मानसिक इजा पोहोचली असून तिने या सर्व वरिष्ठ डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल करण्याचे ठरवले. त्यानंतर शुक्रवारी तिच्यासोबत घडलेला प्रकार पालघर पोलीस ठाण्यात सांगितला.
प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या तक्रारीवरुन १५ वरिष्ठ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेहमीच चर्चेत राहणारे ढवळे रुग्णालय आता या रॅगिंग प्रकरणामुळे वेगळ्या चर्चेत आले आहे.