पालघर - मोखाडा तालुक्यातील पाण्याची समस्या अत्यंत गंभीर असून हे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी महिलांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत धरणे आंदोलन केले. या आंदोलनकर्त्यांची विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी भेट घेत आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. तालुक्यातील पाणी प्रश्नासंबंधी शुक्रवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सुनिल भुसारा, आंदोलनकर्ते, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
हेही वाचा - पाणीप्रश्नसाठी महिला उतरल्या रस्त्यावर; पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
या आधीच्या शासकीय उदासीनतेमुळे येथील पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनला. येथील पाण्याच्या समस्या, पाणीप्रश्न मार्गी लागावेत यासाठी मोखाडयाहून पालघर येथे येऊन महिलांना आंदोलन करण्याची वेळ आली. लोकप्रतिनिधी या नात्याने या आंदोलनाला माझा पाठिंबा असून येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. मोखाडा परिसरात धरणे बांधून पाणी अडवण्यात आले, मात्र पाण्याची समस्या सोडविण्यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता असल्याची प्रतिकिया सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा यांनी दिली.
हेही वाचा - आधी पुनर्वसन मगच विस्थापन, गारगाई धरण प्रकल्पग्रस्तांची मागणी
मोखाडा तालुक्यात प्रस्तावित दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्प रद्द करा, अप्पर वैतरणा समोर पाणीपुरवठा योजना मंजूर करा, तालुक्यात पर्याय जल आखाडा तयार करा व तालुक्यात अस्तित्वात असलेल्या धरणांच्या पाण्याचे योग्य नियोजन करा, या मागण्यांसाठी कष्टकरी संघटना आणि भू-पाणी हक्क संघर्ष समितीच्या नेतृत्वात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चात हजारो महिलांनी सहभाग घेत मोखाडा तालुक्यातील पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची मागणी केली.