पालघर - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिन सोहळा येथील कोळगाव पोलीस परेड ग्राऊंडवर उत्साहात साजरा झाला. पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र ही संत, विचारवंत आणि शूरवीर यांची भूमी असून देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान आहे. देशाच्या, पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी १ मे हा दिवस जगभरात कामगार दिन म्हणून पाळला जातो. आपल्या पूर्वजांनी दिलेले योगदान आणि आपला वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा आपण आजच्या दिनी निर्धार करूया, असे याप्रसंगी पालकमंत्री विष्णू सवरा म्हणाले.
यावेळी झालेल्या संचलनात पालघर पोलीस दल, महिला पोलीस दल, नगरपालिकेचे अग्निशमन दल, फॉरेन्सिक सायन्स पथक, पालघर पहिली महिला दामिनी पथक, आरोग्य विभागाची १०८ रुग्णवाहिका, बॉम्बशोधक पथक, दंगल नियंत्रण पथक, शीघ्र प्रतिसाद दल आदींनी सहभाग घेतला.
१५ वर्ष उत्कृष्ट सेवाभिलेख ठेवून बजावलेल्या कामगिरीबद्दल माणिकपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप नामदेव विंदे यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करून जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी भगिनी समाज विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, नगराध्यक्ष उज्वला काळे, जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते.