पालघर - चोर समजून नागरिकांनी एका प्रियकराला बेदम चोप दिल्याची घटना विरार, फुलपाडा येथील डोंगरी परिसरात घडली आहे. रविवारी रात्री 12 वाजता याच परिसरात राहणारा एक तरुण मद्यधुंद अवस्थेत आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. यावेळी ही घटना घडली.
प्रेयसी राहत असलेल्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूने पाईप व ग्रिलवर चढून मोठ्या कसरतीने टेरेसपर्यंत पोहोचला. त्याचवेळी बिल्डिंग परिसरात वावरणाऱ्या काही नागरिकांचे वर चढणाऱ्या या तरुणाकडे लक्ष गेले. काही दिवसांपासून या परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने हा तरुण चोर असल्याचा संशय नागरिकांना आल्यानंतर त्यांनी मोठमोठ्याने चोर चोर ओरडायला सुरुवात केली. आपल्याला चोर समजत असल्याचे या तरुणाला समजताच हा तरुण दचकला व पळ काढू लागला. तो एका बिल्डिंगच्या टेरेसवरून दुसऱ्या बिल्डिंगवर उड्या घेत असल्याने नागरिकांचा हा नक्कीच अट्टल चोर असल्याचा संशय वाढला.
अखेर दोनशे ते तीनशेहून अधिक संतप्त नागरिकांनी या प्रियकर चोराला खाली उतरवून बेदम चोप देत आपल्या संतापाची वाट मोकळी केली. नागरिकांच्या मारहाणीत हा तरुण बऱ्यापैकी जखमी झाला. प्रेयसीला भेटण्यासाठी केलेली ही कसरत त्याला चांगलीच महागात पडली आहे. पोलिसांत या घटनेची तक्रार करण्यात आलेली नाही.