पालघर - परतीच्या मुसळधार पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या 4 दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, डहाणू,पालघर, तलासरी, वसई भागात सायंकाळपर्यंत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे कापणी केलेली भातपिके पावसाच्या पाण्यात भिजून त्यांना फुटवे फुटले आहेत. तर काही भाताच्या लोबींना कोंबही फुटले आहेत. तर भातशेती नुकसानाचे पंचनामे करायला अधिकारीवर्ग फिरकत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा - वसई-विरारमध्ये परतीचा पाऊस बरसला
1 नोव्हेंबरच्या रात्रीच्या वादळी मुसळधार पावसाने शेतकऱ्यांनी कापणी केलेले भात पीक पाण्याखाली गेले आहे. पिके पाण्यातून काढण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असतानाच परत पावसाने हजेरी लावल्याने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे खाण्यापुरते तरी पीक मिळू दे, अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच सरकारकडून लवकरात-लवकर नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - वाघोबा खिंड येथे ट्रकचा अपघात; चालक व क्लिनर बचावले
वाडा तालुक्यात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी पंचनामे केले जात आहेत. तालुक्यात 45 टक्के पंचनामे झाले आहेत. तर या नुकसानभरपाई संदर्भात पालघर येथे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी बैठक घेतली असल्याचे कृषी अधिकारी माधव हासे यांनी सांगितले.