पालघर - शेती व्यावसायाला पुरक असलेला शेतकर्याचा जोडधंदा म्हणजे कुक्कुटपालन. पण कुक्कुटपालन व्यवसाय हा सद्या कोरोना व्हायरसच्या भीतीने अडचणीत सापडला आहे. कोरोना व्हायरसच्या अफवेचा फटका बाधीत पोल्ट्री व्यावसायिकांना बसला आहे. उत्पादीत मालाचे करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय. पोल्ट्री व्यावसायिकांना शासनाचा दिलासा हवा आहे. कारण 200 रूपये प्रतिकिलोची कोंबडी आता 10 रुपयांवर आली आहे.
पक्षी वाढवण्यात केलेली मेहनत मोफत जात जात आहे. मेहनत सोडाच पण तयार झालेल्या मालाचे करायचे काय? हा प्रश्न पोल्ट्रीधारकांना सतावत आहे. कर्जदार शेतकरी तर आत्महत्या करावी का? असा सवाल करत आहेत. शासनाने आमच्या पोल्ट्री धारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. कोरोना व्हायरसच्या अफवने पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे. यावर अवलंबून असलेले कोंबडी मांस विक्रेते, खाद्यान्न पिक उत्पादक शेतकरी आणि कंपन्याही अडचणीत सापडल्या आहेत.
कोंबडीला उचल नाही म्हणून खाद्यान्न देणे, लाईट बील आणि इतर खर्च वाढतोय आणि त्यातच मातीमोल भावाने होत असलेली कोंबडीची विक्रीने 'चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला' अस म्हणण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. भाव गडलेल्या या कुक्कुटपालन व्यवसायावर खाद्यान्न उत्पादीत करण्यात येणारा सोया आणि मका उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कोंबडीच्या खाद्यान्नामध्ये 60 टक्के प्रमाण हे सोया, तांदळाचे बारीक तुकडे याचा समावेश असतो. आता त्यांची मागणी घटली आहे.
पोल्ट्री धारकांना महागडे खाद्य देणे परवडत नाही. तयार झालेली कोंबडी आता मरायला सुरूवात झाली आहे. लहान कोंबडी पक्षी विकत घ्यायची 25 रुपयाला आणि विकायचे 10 रुपयाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तोही पक्षी फुकट घ्यायला तयार नाही. मांस विक्रेत्यांवर मंदीची लाट आली आहे. बाजारात चिकनचा भाव प्रतिकिलोला 200 रूपये असताना आता तो 80 ते 100 रूपयाने खाली आला आहे. गिऱ्हाईक नसल्याने धंदा होत नाही. धंदा बंद करण्याची वेळ आली असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. कोरोना व्हायरसच्या अफवेने आज कुक्कुटपालन व्यवसायावर अवलंबून असणा-या शेती आणि उद्योग धंद्यावर परिणाम झाला आहे.
पालघर जिल्ह्यात 150 पोल्ट्री फार्म आहेत. आमच्या कंपनीला 150 ते 200 कोटी रूपयांचे दिवसाला नुकसान होते. कोरोना अफवेने पोल्ट्रीतील पक्षी उचलले जात नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
माझ्यावर पोल्ट्री आणि शेतीव्यवसायाकरीता बँकेचे 10 लाखाचे कर्ज आहे. मी 10 वर्षापासून पोल्ट्री व्यवसाय करत आहे. आज या तयार कोंबडीची माल हा कोरोनाच्या अफवेने उचलला जात नाही. आज 10 रुपयाला कोंबडी द्यावी लागतेय. अशा परिस्थितीत आमच्यासारख्या पोल्ट्री व्यावसायिकांनी करायचे काय? असा सवाल पोल्ट्री व्यावसायीक गणेश चासकर (कुडूस) यांनी केला.
25 ते 30 रुपयाने लहान पक्षी खरेदी करायचा आणि तो आता 10 रुपयाला विकावा लागत आहे. याबाबत कोरोना कमी आणि अफवा जास्त असल्याचे मत पोल्ट्री व्यवसायिक जगदीश पाटील ( नेहरोली, वाडा) यांनी व्यक्त केले.
कर्ज काढून शेतकरी पोल्ट्रीचा व्यवसाय करतात. यावर शासनाने उपाययोजना कराव्यात असे मत दिपक हरड (वाडा) यांनी व्यक्त केले. सुगुना फुड्स प्रा. लि.कंपनीचे 8 लाख पक्षाचे उत्पादनासाठी 150 पोल्ट्री फार्म आहेत. 1 किलोग्रॅम कोंबडी तयार करण्यासाठी 70 ते 75 रूपये खर्च येतो. तर कोरोना व्हायरस अफवने बाजारात 10 रूपये दराने कोंबडी जातेय. 60 ते 65 रूपयांचे नुकसान होत असल्याचे मत नामदेव खिरारी (जव्हार) यांनी व्यक्त केले. कोंबडीचे खाद्यान्न तयार करणाऱ्या उत्पादक शेतकरी वर्गाचा मालाच्या किमतीवर परिणाम झाला आहे. या खाद्यान्न मका, सोयाबीन आणि तांदुळ असे 60% प्रमाण असते. मकेचा पूर्वीचा भाव - 22 ते 24 रूपये आता 10 ते 12 रूपये प्रतिकिलो. सोयाबीन पूर्वीचा भाव- 30 ते 35 रूपये आता 15 ते 17 रूपये, तांदुळ (कणी) पूर्वीचा भाव - 15 ते 18 रूपये आता 10 ते 12 रुपये.