पालघर (विरार) - सुरुवातीला शहरी भागात असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागापर्यंत पोहचला आहे. पालघरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून विरारमधील अर्नाळा ग्रामपंचायत परिसरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
अर्नाळा ग्रामपंचायत हद्दीत आजपासून(३० जून) पुढील आदेश येईपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे. गेल्या दहा दिवसात अर्नाळा गावात 30 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत तर, एकाचा मृत्यू झाला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील नाळेकर पाडा, कोळीवाडा, बंदरपाडा, एस टी पाडा हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत.
अर्नाळा बंद काळात सकाळी 7 ते 10 या तीन तासांच्या काळातच गावातील दुकाने सम-विषम नियमाप्रमाणे सुरू राहतील. समुद्र किनाऱ्यावर फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल खेळण्यावरही बंदी राहील. वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, पालघरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक गावांनी स्वत:हून लॉकडाऊन करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वीच मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सातपाटी गावाने देखील पूर्णपणे बंदाला सुरुवात केली आहे.