पालघर - एमएमआरडीएच्या कामासाठी गावातील वनहक्क समितीची दिशाभूल केली. तसेच वेती गावातील वनांची जागा एमएमआरडीएच्या घशात घातली. त्यामुळे वनहक्क कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकार्यांवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी कष्टकरी संघटना आणि वेती गावच्या ग्रामस्थांनी कासा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला. तसेच धरणे आंदोलन केले. या मोर्चात हजारोच्या संख्येने वनपट्टेधारक तसेच कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सहपरिवार शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचे पाणी एमएमआरडीएने आरक्षित केले असून हे पाणी वसई विरार तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिकेला पुरवठा केला जाणार आहे. यासाठी वेती गावातील अनेकांच्या जमीन एमएमआरडीएकडून संपादित करण्यात येणार आहेत. शासनाने वनहक्क समितीला दिलेली 226 हेक्टर जमीन कमी करून 114 हेक्टर करण्यात आली. मात्र, डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण समितीला विश्वासात न घेताच परस्पर हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा कमिटीने सामूहिक पट्ट्यातील क्षेत्र कमी करून वन हक्क कायद्याचे उल्लंघन केले आहे. म्हणून ज्या अधिकाऱ्यांच्या कमी क्षेत्र केलेल्या पट्ट्यावर सह्या केल्या आहेत, अशा अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आपला रोष व्यक्त करण्यासाठी व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी गावातील ग्रामस्थ, वनपट्टेधारक व कष्टकरी संघटनेच्यावतीने कासा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.