पालघर Palghar Crime News : समाजात एकीकडं आईचं महत्व सांगणाऱ्या गोष्टी आपण ऐकतो, तसेच आई आपल्या बाळासाठी प्रसंगी जीवही देऊ शकते अन् जीवही घेऊ शकते अशी अनेक उदाहरणे आपण आजवर पाहिलेली आहेत. मात्र, मोखाडा तालुक्यात माता न तू वैरिणी असल्याची वेळ आलीय. पुरुष जातीचं एक नवजात जिवंत अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोटच्या पोराला बेवारस सोडून टाकणाऱ्या 'त्या' मातेबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे. समाजात मुलं व्हावं यासाठी असंख्य उपचार, प्रयत्न करणारी अनेक जोडपी आहेत. असंच एका घटनेत पोटच्या बाळाला बेवारस सोडून देणाऱ्या अपप्रवृत्तीमुळं खंरतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
नदीच्या आसपास सापडले अर्भक : या संदर्भात मोखाडा पोलिसांनी (Mokhada Police) अशी माहिती दिली की, वाशाळा येथे राहणारे चालक आकाश लहामगे व्यवसाय निमित्तानं पोशेरा फाट्यावरून जात असताना, वाखारीचा पाडा गावच्या शिवारात नदीच्या पात्राच्या आसपास लाल कपड्यात गुंडाळण्यात आलेले अंदाजे २ दिवसांचे अर्भक त्यांना आढळून आले. आकाश यांनी क्षणाचाही विलंब न लावता या भागात आरोग्य सेवक असलेल्या त्यांच्या नातेवाईकाला कळवलं. त्यानी तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब चत्तर यांना माहिती दिल्यानंतर, मोखाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मी तालुक्यात पीकअप वाहनातून माल वाहतूक करीत असतो. आज नेहमीप्रमाणे जाताना मला एका पुलाजवळ काहीतरी लाल कपड्यात गुंडाळलेले दिसले. खात्री केल्यावर त्यामध्ये एक बाळ असल्याचं दिसलं. लगेच आरोग्य विभागात असलेल्या भावाला कळवलं. एक माणूस म्हणून मी माझे कर्तव्य केलं - आकाश लहामगे, वाहन चालक, वाशाळा
पुढील तपास सुरू : खरं तर संबंधित अर्भक जिवंत असल्यामुळं काही वेळापूर्वीच सोडून गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अगदी रस्त्याच्या कडेला नदीपात्रापासून लांब हे अर्भक सोडल्यामुळं खर तर सोडणाऱ्यालाही ते जिवंत राहावं असं वाटत असावं. अर्भकास पुढील उपचारासाठी जव्हार कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे. या घटनेमुळं सर्वत्र संताप व्यक्त होत असून पुढील तपास मोखाडा पोलीस करीत आहेत.
हेही वाचा -