पालघर - डहाणू तालुक्यातील पाटीलपाडा, कोटबीगाव येथे अवैद्य मद्य व ताडी विक्री करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. यात एक लाख 11 हजार 630 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तरुणाला मारहाण करणाऱ्या ५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल
डहाणू तालुक्यातील वाणगाव परिसरात पहाटे गस्त घालत असताना पाटीलपाडा, कोटबीगाव येथे अवैध मद्यसाठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पाटीलपाडा, कोटबीगाव येथे छापा टाकला. त्यावेळी विनोद गोविंद घोसाळ हा परराज्यातील व्यक्ती मद्यसाठा करून विक्री करत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून चार बॉक्स विदेशी मद्य, 14 बॉक्स बिअर जप्त करण्यात आल्या आहेत.
या अवैद्य मद्यसाठ्याचा पंचनामा सुरू असताना त्याच गावात बच्चू बाबू मासमार हा व्यक्ती जंगलात ढाबा टाकून अवैधरित्या विदेशी मद्य व ताडीची राजरोसपणे विक्री करत असल्याचे आढळले. त्याच्याकडून चार बॉक्स विदेशी मद्य, 30 बिअरच्या बाटल्या, 260 लिटर ताडी व 2 फ्रिज असा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.