पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका हॉटेलवर आज पहाटे दरोडा घालण्यात आला. तीन दरोडेखोरांनी आकाश हॉटेल येथे रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत १ लाख दहा हजार रुपयांची लूट केली. यावेळी हॉटेल मालक आणि काही कामगारांनी या दरोडेखोरांचा विरोध करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर दरोडेखोर ज्या गाडीतून आले होते, ती चारचाकी तिथेच टाकून ते पसार झाले आहेत.
फिल्मी स्टाईलने टाकला दरोडा..
तलासारी तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आकाश नावाचे हॉटेल आहे. बुधवारी रात्री तीन लोक याठिकाणी आले होते. यावेळी त्यांनी हॉटेलची, तिथल्या सुरक्षा व्यवस्थेची, एकूण व्यवसायाची पाहणी केली, आणि ते तिथून निघून गेले. त्यानंतर गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास हेच तिघे हॉटेलमध्ये परत आले. यावेळी त्यांनी हॉटेल मालक आणि कामगारांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. यावेळी मालक आणि काही कामगारांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दरोडेखोरांनी रिव्हॉल्वरने हवेत तीन गोळ्या झाडल्या. ज्यामुळे घाबरुन मालकाने त्यांना पैसे दिले.
गाडी तिथेच टाकून दरोडेखोर पसार..
दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोरांनी गाडीतून पसार होण्याचा प्रयत्न केला. हॉटेल मालक आणि कामगारांनी मिळेल त्या वस्तू घेत गाडीवर हल्ला चढवला. त्यांनी झटापटीमध्ये गाडीची चावीही काढून घेतली. त्यामुळे हे दरोडेखोर ज्या गाडीतून आले होते ती गाडी तिथेच सोडून पसार झाले.
दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच पालघरचे अप्पर पोलीस अधीक्षक, कासा आणि तलासरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांमधील दोन गोळ्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा : चेंबूर रेल्वे स्थानकाजवळील दुकानाला आग...2 तासानंतर आगीवर नियंत्रण