वसई (पालघर) - तालुक्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक 196 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील मांडवी येथे 132 मिलिमीटर, आगाशी 205 मिलिमीटर, निर्मल 234 मिलिमीटर, तर विरार 214 मिलिमीटर, मणिपूरमध्ये 168 मिलिमीटर, वसईमध्ये 218 मिलिमीटर पाऊस पडला असून सरासरी 24 तासात 196 मिलिमीटर पाऊस पडला आहे.
जून महिन्यापासून ते आतापर्यंत 1 हजार 528 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. सकाळी दहानंतर मात्र पावसाचा जोर कमी झाला.
या पावसाने विरार, नालासोपारा येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नालासोपारा पूर्व तुळींज पोलीस ठाणे ते ओसवाल नगरीपर्यंत पूर्ण रस्ता पाण्याखाली गेला. आचोले रस्ता, अलकापुरी रस्ता, नागिंदास पाडा, महानगरपालिका रुग्णालयासमोरील सर्व रस्ते जलमय झाले असून गुडघाभर पाणी साचले आहे.
वसई पश्चिम विवा कॉलेज, बोळींज, रामनगर, एम बी इस्टेट या परिसरात मांडी इतके पाणी साचले आहे. रामनगर परिसरातील दहा ते पंधरा सोसायटी पाण्याखाली गेल्या आहेत. तळमजला घरात दोन फूट पाणी साचले आहे.