पालघर - संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे कच्च्या घरांचे नुकसान झाले आहे.
हवामान विभागामार्फत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर पालघर, बोईसर, सफाळे, डहणूसह ग्रामीण भागात विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बरसला आहे. यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले असून रस्ते पाण्याखाली गेल्याने काही ठिकाणची वाहतूक बंद आहे. सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी अधूनमधून जोरदार सरी हजेरी लावत आहेत.
अनेक भागांमध्ये विद्युत पुरवठाही खंडीत झाला आहे. काही सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे काही घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती वापराच्या वस्तूंचे नुकसान झाले आहे. तसेच सोसायट्यांमधील पार्क केलेली वाहने देखील पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने उसंत घेतली होती. मुख्य शहरी भागात पावसाच्या सरींचे प्रमाण कमी झाले होते. मात्र हवामान विभागाने मुंबईसह पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला आहे.