पालघर : जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर दापचारी तपासणी नाक्यावर अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन टेम्पो तलासरी पोलिसांनी पकडले आहेत. यात दोन वाहनांसह 35 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
भिवंडीकडे जात होते टेम्पो..
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दापचारी तपासणी नाक्यावर पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. याच दरम्यान वापीहून भिवंडीकडे जाणारे दोन टेम्पो पोलिसांनी थांबवले. या टेम्पोची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यामध्ये गुटख्याचा मोठा साठा आढळून आता. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
३५ लाखांचा गुटखा असल्याचा अंदाज..
पोलिसांनी जप्त केलेल्या एकूण गुटख्याची किंमत अंदाजे ३५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पंचनाम्याचे काम तसेच अधिक तपास सुरू आहे. यानंतरच एकूण मालाची नक्की किंमत समजणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक अजय वसावे यांनी याबाबत माहिती दिली.
हेही वाचा : खैराच्या झाडांची तस्करी करणारा ट्रक पकडला; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त