पालघर - "जिल्ह्याचे चित्र एका दिवसात बदलणार नसून शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सर्वांनी विकास प्रकियेचा भाग बनून काम केल्यास लवकरच जिल्हा प्रगतीशील जिल्हा म्हणून आपली ओळख निर्माण करेल." असे वक्तव्य पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हा वर्धापन कार्यक्रमात केले.
पालघर जिल्हा निर्मितीला पाच वर्षे पूर्ण झाली असून या काळात विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी सकारात्मक विचाराने व दृष्टीकोन ठेवून जिल्ह्याच्या विकासाचा वेग आणखी वाढवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले. 'शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सर्वांनी विकास प्रकियेचा भाग बनून काम केल्यास लवकरच जिल्हा प्रगतीशील जिल्हा म्हणून पालघर आपली ओळख निर्माण करेल,' असा विश्वासही यानिमित्ताने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. जिल्ह्याचा वर्धापन दिन तसेच महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्ह्याच्या विकासामध्ये सर्व शासकीय यंत्रणांनी चांगले काम केले असल्याचे सांगून विशेषत: आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व संबंधितांनी उत्कृष्ट काम केल्याचे त्यांनी नमूद करून त्याबद्दल त्यांचे कौतुकही पालकमंत्री यांनी याप्रसंगी केले.
लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यात समन्वय असेल आणि सर्वांनी सक्षमतेने काम केले तर विकास निश्चित होतो, असा विश्वास खासदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला. जव्हार, मोखाडा, विक्रमगड परिसराचा विकास होणे अपेक्षित असून आश्रमशाळा अद्ययावत व्हाव्यात तसेच येथील सिंचन प्रकल्प वाढावेत असे प्रतिपादन आदिवासी विकास आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी यावेळी केले.