पालघर- जिल्हातील वसई भागातील मोरी गावात सतत सुरू असलेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीचा भेट देऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आढावा घेतला आहे. त्यानंतर तात्काळ उपाययोजना करण्याच्या अधिकार्यांना सुचना केल्या आहेत.
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे काही भागात आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्ह्यातील पुरामुळे बाधित झालेल्या परिसरांंची पाहणी केली. जिल्ह्यातील वसई भागातील मोरी गावात सतत सुरू असलेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या भागातील गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पुरात वाहून गेलेल्या पवन प्रजापती यांच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी भेट घेत त्यांना शासनाद्वारे सर्व ती मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. वसई येथील मिठाघर व टी पॉईंट भागात मुसळधार पाऊस व समुद्राच्या भरतीमुळे रस्त्यावर पाणी साचुन वाहतूक विस्कळीत झाली होती. सध्या पाऊस थांबला असून रस्त्यावरील पाणी कमी होत आहे. वाहतुकीचा मार्ग सुरळीत होत आहे. त्या भागाची तहसीलदार तसेच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत रवींद्र चव्हाणयांनी पाहणी केली. त्या भागात सर्व ती मदत करावी असे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
मनोर येथे देखील पालकमंत्र्यांनी पाहणी केली, येथे सूर्या नदीला आलेल्या पुरामुळे काही भागात पाणी साचले होते. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पुराचे पाणी ओसरत असून त्या भागाची पाहणी करून झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.