पालघर - रिलायन्स फाउंडेशनच्या नावाने व्यवसाय मिळण्याचे आमिष दाखवून 2 हजार 580 विधवा महिलांची फसवणूक करणाऱ्याला जेरबंद करण्यात आली आहे. आरोपीने महिलांकडून तब्बल 7 लाख 74 हजार रुपये उकळले आहेत. मनोर पोलिसांनी ही कारवाई केली. राहुल रामू वाडू (वय - 25, रा. कुर्झे, दगडीपाडा, ता. विक्रमगड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अशाप्रकारे फसवणूक झालेल्या महिलांनी मनोर पोलीस ठाण्यात संपर्क करा, असे आवाहन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले आहे.
आरोपी राहुल वाडू हा मुंबईतील वरळी येथे रिलायन्स फाउंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये हाउसकिपिंग विभागात काम करीत होता. त्याने नोकरीचा राजीनामा दिला होता. यानंतर ऑक्टोबर 2019 पासून रिलायन्स फाउंडेशनच्या नावाखाली पालघर जिल्ह्यात 8 महिला व 3 पुरुष अशी अकरा जणांची एक टीम तयार केली. ही टीम जिल्ह्यात अनेक गावपाड्यात जाउन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, नीता अंबानी, मुकेश अंबानी अशा बड्या मंडळींचे फोटो असलेले बॅनर वापरुन रिलायन्स कंपनी कोणकोणते व्यवसाय करते, त्यांची गुंतवणूक, किती प्रकल्प आहेत याबाबत माहिती द्यायची.
या रिलायन्स फाउंडेशनमार्फत गावात रस्ते, पाणी पुरवठा, वीजेची व्यवस्था अशी अनेक कामे केली जातील. तसेच विधवा महिलांना व्यवसायासाठी 40 हजार रुपये देण्यात येतील यासाठी नाव नोंद करून 300 रुपये डीडीसाठी द्या, असे महिलांना सांगण्यात आले.
नाव नोंदणी करून सहा महिने उलटूनही या महिलांना व्यवसाय करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनकडून कोणतीही मदत मिळाली नाही. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात या लोकांना लक्षात आले. यानंतर पालघर तालुक्यातील गांजे-ढेकाळे येथील फसवणूक झालेल्या राजश्री तांडेल या महिलेने मनोर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्या अनुषंगाने मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी दराडे आणि पोलीस उपनिरक्षक रिजवाना ककेरी यांनी यांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपी राहुल रामू वाडू याला अटक केली.
रिलायन्स फाउंडेशनच्या नावाने आरोपीने महिलांकडून आतापर्यंत तब्बल 7 लाख 74 हजार उकळल्याचे समोर आले आहे. तसेच आरोपीकडून महिलांचे आधार कार्ड, पतीचे मृत्यू दाखले, रेशनिंग कार्ड, बँक पासबुक, बॅनर बायोमेट्रिक मशीन, लॅपटॉप, दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहे.