पालघर - जिल्ह्यातील वाडा शहरात माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी मतदानाचा हक्क बजावला. विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांनीही आपल्या कुटुंबीयांसोबत मतदान केले.
विष्णू सवरा यांचे चिरंजीव हेमंत सवरा हे विक्रमगड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे त्यामुळे नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन विष्णू सवरा यांनी केले. विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत सवरा यांनी देखील नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत.