वसई (पालघर) - रेल्वेच्या इतिहासात प्रथमच पश्चिम रेल्वे मार्गावर महिलांनी मालवाहतूक रेल्वे चालवली आहे. लोको पायलट कुमकुम सूरज डोंगरे, सहायक लोको पायलट उदिता वर्मा आणि वस्तू गार्ड आकांक्षा राय असे या महिलांचे नाव आहे. ५ जानेवारी रोजी मुंबईच्या वसई रोड स्थानकातून या गाडीला हिरवा कंदील दाखवण्यात आला. ही गाडी ६ जानेवारी रोजी गुजरातमधील वडोदरा येथे पोहोचली. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी महिला सक्षमीकरणाचे एक उदाहरण म्हणून या घटनेचे वर्णन केले. पश्चिम रेल्वेसाठी हा दिवस खरोखरच अविस्मरणीय आहे. इतर स्त्रियांसाठी हे खरोखर एक अनुकरणीय आदर्श असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
इतर महिलांनाही प्रेरणा मिळेल -
महिला चालकांकडून संपूर्ण मालवाहू रेल्वे चालवण्याची पश्चिम रेल्वेच्या इतिहासात ही पहिलीच घटना आहे. पहारेकरी आणि लोको पायलट यांच्या कठीण कामामुळे या पदांवर नोकरीसाठी फारच कमी महिला पुढे येतात. भारतीय रेल्वेमध्ये आव्हानात्मक नोकरीसाठी इतर महिलांना प्रेरित करण्यासाठी ही कामगिरी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असेही कंसल यांनी म्हटले.
महिला आव्हानात्मक कामे स्विकारण्यास तयार -
आता आपल्या देशातील महिला आव्हानात्मक नोकरी स्विकारण्यास व घरगुती कामांच्या मर्यादेपलीकडे त्यांची क्षमता सिद्ध करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. पश्चिम रेल्वे या शूर महिला कर्मचार्यांच्या धैर्य व दृढनिश्चयाला सलाम, असेही कंसल यांनी म्हटले.
हेही वाचा - नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली