पालघर : कोरोनामुळे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून बंद असलेल्या रेल्वे लोकलचा फटका वसईत फूलशेती करणाऱ्यांना बसला आहे. दररोज सकाळी पहिल्या लोकलने वसईची फुले विक्रीसाठी मुंबईच्या बाजारात दाखल होत होती. मात्र, आता रेल्वेसेवा बंद असल्याने शेतकऱ्यांना फुले खासगी वाहनाने मुंबईत न्यावी लागत आहेत. यात कामगारांचे पगार तसेच वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना न परवडणारा असल्याने वसईचा फुलशेतकरी संकटात सापडला आहे.
सदाफुली, जास्वंद, सोनचाफा, झेंडू, तागरा, मोगरा अशा विविध फुलांची बारा महिने वसईत शेती केली जाते. छोटे मोठे असे पाचशेहून अधिक शेतकरी या व्यवसात आहेत. परंतु, लॉकडाऊनमुळे फुले झाडावरच कोमजली होती. मात्र, आता व्यवहार सुरळीत झाले असले तरी, रेल्वेसेवा सुरळीत होण्यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे शासनाने नियम पाळून लोकलमधून मालवाहतुकीसाठी फुलव्यावसायिकांना मुभा द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. शिवाय, या व्यवसायावर पोट असलेले कामगार यात भरडले जात असून त्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. काढलेली फुले न परवडणाऱ्या खर्चामुळे शेतातच पडून असतील तर, आमचे पोट कसे भरणार, अशी चिंता त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.
कोरोनामुळे फक्त अत्यावश्यक सेवेसाठी रेल्वेसेवा ही खुली आहे. मात्र या रेल्वेमध्ये गर्दीचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यामुळे लोकलमध्ये कोरोनाचा संसर्ग होत नाही का, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत असून रेल्वे पुन्हा कधी सुरळीत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - काढणीला आलेल्या भात पिकावर पावसाचे संकट; शेतकरी चिंतातुर