पालघर - मोदी सरकारचा महत्वकांशी असलेला प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्प आणि मुंबईतून मच्छी मंडई हद्दपार करण्याचा राज्य सरकारचा घाट, असा अनोखा देखावा पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील मच्छीमार नरेंद्र नाईक यांनी साकारला आहे. आपल्या घरगुती गणेशोत्सवात या देखाव्याच्या माध्यमातून मच्छीमारांच्या प्रश्नांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न नाईक यांनी केला.
हेही वाचा - टेंभोडे येथील राकेश पाटील यांनी साकारला ऑक्सिजन प्लांटचा देखावा
तारापूर येथील मच्छीमार नरेंद्र नाईक यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवात मच्छीमार, कोळी समाजावर आलेल्या विघ्नांची प्रतिकृती साकारत देखावा सादर केला आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावित असलेले वाढवण बंदर उभारल्यास पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमार देशोधडीला लागून नाहीसा होईल. तर, दुसऱ्या बाजूला मुंबईतील मीनाताई ठाकरे मच्छी मंडई हलवण्याचा घाट राज्य सरकारने घातला असून, यामुळे मुंबईतील मच्छीमार, कोळी समाजाचेसुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. त्यामुळे, वाढवण बंदर आणि मंडईचे स्थलांतरण हे मच्छीमार, कोळी समाजावर येणारी दोन मोठी विघ्न असून गणेशोत्सवात देखाव्याच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न नाईक यांनी केला आहे.
देखाव्याच्या माध्यमातून नाईक यांनी या दोन्ही प्रकल्पांचा निषेध केला आहे. मच्छिमार, कोळी समाजावर येणारी ही दोन्ही विघ्ने विघ्नहर्ता लवकरच दूर करेल, असा विश्वास नाईक आणि हजारो मच्छीमार व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - पालघर : उर्से गावात 49 वर्षांपासून एक गाव एक गणपती