पालघर : आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( AI ) तंत्रज्ञानाचा वापर करुन मुलींची अश्लील छायाचित्र बनवून ब्लॅकमेल केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेला हा राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा असल्याचा दावा करण्यात येत आहे. जीत निजाई असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करुन तरुणींचे अश्लील छायाचित्रं बनवणाऱ्या नराधमाचं नाव आहे. जीत हा नालासोपारा पश्चिमेच्या कळंब गावातील राहणारा आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं बनवली अश्लील छायाचित्र : या घटनेतील नराधम जीत निजाई यानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करुन अल्पवयीन तरुणीची अश्लील छायाचित्र बनवून ती व्हायरल केली होती. त्यासाठी जीत निजाईनं सोशल माध्यमांवर बनावट खाते बनवून त्याच्या खात्यावरुन हे अश्लील छायाचित्र प्रसारित केले होते. तरुणींची छायाचित्र सोशल माध्यमांवर प्रसारित झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती.
जाब विचारणाऱ्या पीडित तरुणींना मारहाण : कळंब येथील जीत निजाई या नराधमानं आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं शहरातील अल्पवयीन तरुणींची अश्लील छायाचित्र तयार केली होती. त्यानं काही तरुणींची छायाचित्र सोशल माध्यमांवर प्रसारित केली होती. त्यामुळे वसई विरार शहरात मोठी खळबळ उडाली. याबाबतचा जाब विचारण्यास गेलेल्या पीडित अल्पवयीन तरुणींना जीत निजाई आणि त्याच्या भावानं सोमवारी जबर मारहाण केली. त्यामुळे कळंब गावात मोठी तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा दोन्ही भावांवर तरुणींना मारहाण, विनयभंग आणि बालकांचं लैंगिक संरक्षण अत्याचार विरोधी कायद्याच्या ( पोक्सो ) विविध कलमांसह गुन्हा दाखल केला. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं गुन्हा केला असल्यानं आयटी अॅक्टनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याची मुले : कळंब गावातील अल्पवयीन तरुणींची आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं अश्लील छायाचित्रं बनवणारा जीत निजाईचे वडील मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. रक्षकाच्या मुलांनीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन मुलींची अश्लील छायाचित्रं तयार केल्यानं मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
एआयचा वापर झालेला राज्यातील पहिला गुन्हा : आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर विविध क्षेत्रात केला जात आहे. मात्र, गुन्हेगारांनी याच तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरवात केली आहे. विरारमधील घटनेत तरुणींची अश्लील छायाचित्र बनवण्यासाठी नराधमानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याची माहिती अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कल्याणराव करपे यांनी दिली. या तंत्रज्ञानाचा वापर करून झालेला हा राज्यातील पहिला गुन्हा असल्याची माहिती मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर गुन्हे शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजीत गुंजकर यांनी दिली. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून जरी गुन्हा करण्यात आला असला तरी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (क) आणि (ड) अंतर्गतच गुन्हे दाखल केले जातात असे प्रसिद्ध सायबर तज्ञ अॅड प्रशांत माळी यांनी सांगितलं. यापूर्वी एआयचा वापर करून इतर राज्यात गुन्हे झाले आहेत. परंतु विरारमधील हा गुन्हा राज्यातील पहिलाच आहे, असे मुंबई पोलिसांचे प्रवक्ते आणि राज्याच्या सायबर शाखेचे माजी अधीक्षक डॉ. बाळसिंग राजपूत यांनी सांगितलं.
हेही वाचा -