पालघर - बोईसर पोलीस ठाणे क्षेत्रात अवैद्य धंदे चालू ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षकांना बेकायदेशीर उत्पन्नाचे प्रलोभन दाखविल्याप्रकरणी पोलिस निरीक्षकांनी त्या हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रमेश नौकूडकर असे या गुन्हा दाखल झालेल्या हवालदाराचे नाव आहे.
आरोपी पोलीस हवालदार रमेश नौकूडकर हे पालघर स्थनिक गुन्हे शाखा- बोईसर युनिट येथे कार्यरत आहे. बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांना पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष भेटून अवैद्य धंदे चालू ठेवण्याकरिता बेकायदेशीर उत्पन्नाचे प्रलोभन दाखविले. हे बेकायदेशीर प्रलोभन पोलीस निरीक्षक परकर यांनी धुडकावून लावले. आणि त्यांनी बोईसर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 कलम 7(ड)8 अंतर्गत हवालदार रमेश नौकूडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बोईसर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून रसायन माफिया, अवैध वाळू वाहतूक, जुगार, गुटखा विक्री, अवैध दारू विक्री अशा अनेक अवैध धंद्यांना उधाण आलले आहे. या अवैध धंद्यांना पोलिसांचे संरक्षण असल्याचा आरोप नागरिकांकडून अनेक वेळा करण्यात आला आहे. परंतु आता पोलिसांनीच पोलिसांवर कारवाई केल्यामुळे अवैध धंद्यांना असलेल्या पोलिसांच्या छुपा पाठिंबा समोर आला आहे. या प्रकारामुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली असून अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या प्रकरणाचा तपास व चौकशी सुरू असून पुरावे हाती लागल्यानंतर योग्य कारवाई केली जाईल असे बोईसर उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वास वळवी यांनी सांगितले आहे.