पालघर - विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला शुक्रवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली होती. या अग्नितांडवात 15 कोरोनाबाधितांचा जळून मृत्यू झाला. दरम्यान आता याप्रकरणी रुग्णालयाविरोधात अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
या प्रकरणी रुग्णालय प्रशासन, डॉक्टर आणि कर्मचारी यांच्याविरोधात अर्नाळा पोलीस ठाण्यात कलम ३०४, ३३७, ३३८ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेने सुरू केला असल्याची माहिती देखील संजय पाटील यांनी दिली.
आगीच्या घटनेत 15 रुग्णांचा मृत्यू
नाशिकमधील ऑक्सिजन लीकची दुर्दैवी घटना ताजी असतानाच, विरारमध्ये एका रुग्णालयाला आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये ही दुर्घटना घडली. पहाटे तीनच्या सुमारास रुग्णालयाच्या आयसीयू विभागामध्ये ही आग लागली होती. याठिकाणी १७ रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेत एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकूण त्याच्या पत्निचेही ह्रदयविकाराने निधन झाले.
हेही वाचा - मुंबई पोलिसांनी वाहनांवरील कलर कोडचे नियम केले रद्द