पालघर (वाडा) : वाडा-भिवंडी महामार्गावरील डाकीवली गावाजवळ तानसा नदीवर नव्याने टाकण्यात आलेल्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या कामाचे कंत्राट 'सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर' कंपनीने घेतले होते.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक मोटारसायकल स्वारांचे अपघात झाले आहेत. तर काही मृत्यूमुखी पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. वाडा-भिवंडी महामार्गाची दुरावस्था आणि जीवघेणे खड्डे हे समीकरण या महामार्गाला कायम लागू पडते. 'सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर' कंपनीच्या ठेकेदारांकडून रस्त्याची थातूर-मातूर डागडुजी होते. पुन्हा तेच खड्डे उखडले जातात. तानसा नदीवर काही वर्षांपुर्वी बांधण्यात आलेल्याला या नव्या पुलावर मोठे भगदाड पडले आहे. त्यात पाणी साचले आहे. हे भगदाड प्लास्टिक आणि प्लायवूडने झाकण्यात आले आहे . या पुलावरील वाहतूक बंद करून जवळच्या जुन्या पुलावरून सुरू ठेवण्यात आली आहे.