पालघर - वसईत लॉकडाऊनमध्ये दोन महिने कंपन्या व त्यातील सर्व व्यवहार ठप्प असतानाही महावितरणाकडून या काळातही औद्योगिक कंपन्यांना अव्वाच्या सव्वा वीज देयके पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे कंपनी मालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दोन महिने कंपन्या बंद असतानाही लाखांच्या घरात येणाऱ्या वीज देयकांमुळे कामगारांचे पगार कसे द्यायचे असा प्रश्न कंपनी मालकांसमोर आहे.
वसई पूर्वेतील वालीव येथे वेस्टर्न इंडिया नावाची 'जाई' काजळ बनविण्याची कंपनी आहे. या कंपनीचे प्रमुख राजेश गाडगीळ यांनी शासनाने दिलेल्या आदेशानुसार लॉकडाऊन काळात दोन महिने कारखाना बंद ठेवला होता.
या काळात कामगार जाऊ नये, यासाठी त्यांना पगार दिला जात होता. त्यामुळे या दोन महिन्याचे वीज बिल कमी येईल, अशी आशा त्यांना होती. मात्र चक्क नव्वद हजार व दोन लाख असे बिल आल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. शासनाकडून कामगारांच्या राहण्या व खाण्या-पिण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार कामगारांना भरपगार देऊन शासनाच्या नियमांचे पालन करताना तीन लाखांचे बिल हातात पडल्याने गाडगीळ यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.