पालघर- येथील डहाणू-नाशिक महामार्गावरील कासा येथील सुर्या नदीचा जुना पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, या पूराच्या पाण्यातून पूल ओलांडताना एका गायीच्या हुशारीने तिचा जीव वाचल्याचे दृश्य समोर आले आहे. मात्र, यावेळी इतर चार जनावरे वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुर्या नदीला आलेल्या पुराचा फटका मुक्या जनावरांना बसत आहे. यामुळे शेतकऱयाचेही मोठे नुकसान होत आहे.
जिल्ह्यात मोठा पाऊस होत आहे. नद्या- नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. पाण्यामुळे रस्ता पुर्ण झाकून गेला आहे. सुर्या नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे जुना पूल पाण्याखाली गेला असून धोकादायक परिस्थितीत काही जनावरे पुलावरून जात आहेत. मात्र, नदीचा प्रवाह इतका जोरात आहे की, पुलावरून जाणारी काही गुरे नदीपात्रात वाहून गेली आहेत. या व्हिडिओत एकूण ५ जनावरे पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पाण्याच प्रवाह वेगात असल्याने पूल ओलांडणारी ४ जनावरे पुराच्या पाण्यात वाहून जातात. मात्र एक गाय मात्र पुढे जाण्याचा तिचा निर्णय बदलते आणि पुलावरून माघारी परतते. त्यामुळे तिचा जीव वाचला आहे.