पालघर - भीक कमी आणून दिली म्हणून चिमुकल्याच्या वडिलांनी स्वतःच्या मुलावर दंडुक्याने प्रहार केला आहे. यात त्या चिमुकल्याच्या हाताचे हाड मोडले आहे. ही घटना पालघरच्या पूर्वेकडील असलेल्या गांधीनगर येथे घडली. मुलावर पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - जखमी तरुणाचे प्राण वाचविण्यासाठी रेल्वे चक्क उलटी धावली!
गांधीनगर येथे डोक्यावर छप्पर नसलेल्या व दारिद्र्याने ग्रासलेल्या कुटुंब प्रमुख संजय बारी हा या परिसरातील मैदानात छप्पर टाकून राहतो. त्याची पत्नी आणि चिमुकला सूर्याला भीक मागायला लावून स्वत: दारु ढोसत असल्याचे समोर आले आहे. चार दिवसांपूर्वी लहान मुलगा पालघर शहरात नेहमीप्रमाणे भीक मागून घरी आला. घरी आल्यानंतर पैसे कमी आणल्याच्या रागातून वडिलाने त्याच्या डाव्या हातावर एका दंडुक्याने प्रहार केला. या प्रहरामुळे चिमुकल्या सूर्याच्या हाताचे हाड मोडले. वडील व मुलात चाललेली ही झटापट होताना शेजाऱ्यानी पाहिले व संजय याला थांबवले, मात्र वेदनेने विव्हळत असलेला चिमुकला तेथून पळून गेला.
दोन दिवसानंतर म्हणजे मंगळवारी पालघर शहरातील बिकानेरी येथे सूर्या नेहमीप्रमाणे आला, मात्र तिथे तो उभा राहून रडत होता. तेथे काम करणाऱ्या व उभ्या असलेल्या काही तरुण मुलांनी त्याच्याकडे तू का रडत आहेस अशी विचारणा केली. सुरुवातीला हा चिमुकला काहीच बोलला नाही. या मुलांनी त्याचा विश्वास संपादन केल्यानंतर, त्याच्या वडिलांनी त्याला मारले असल्याचे या मुलांना समजले. त्यानंतर केवल घरत, सनी जैन, पिंटू ठाकूर व प्रथम बोरडेकर या तरूणांनी सामाजिक बांधिलकी जपत सूर्याला घेऊन थेट ग्रामीण रुग्णालय गाठले. तिथे आल्यानंतर त्याच्या डाव्या हाताचे हाड मोडल्याचे कळले. ग्रामीण रुग्णालयात आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचारी व आरोग्य सेवा देणाऱ्या वर्षा काटेला यांनीही सूर्याच्या उपचारासाठी बरीच खटाटोप केली. चिमुकल्या सूर्याची अस्थीरोग तज्ज्ञांमार्फत त्याची तपासणी करण्यात आली असून, ग्रामीण रुग्णालयातच त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
चिमुकल्याला मारल्याप्रकरणी त्याचे वडील संजय बारी याचा जबाब पालघर पोलिसांनी घेतला असून पोलीस पुढील तपास करित आहेत.