पालघर - लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार सचिन शिंगडा यांनी छाननीदरम्यान घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. यामुळे गावित यांचा अर्ज वैध ठरला. मात्र, निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती सचिन शिंगडा यांनी यावेळी दिली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झल्यानंतर आज झालेल्या छाननी दरम्यान सचिन शिंगडा यांनी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार गावित यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. गावित यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर माहितीत काही शासकीय निवासस्थानासंबंधी थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र जोडलेले नसल्याबद्दलचा हा आक्षेप होता. निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी या हरकती अनुषंगाने हरकतीदार व उमेदवार राजेंद्र गावित यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर संध्याकाळी 7.45 वाजताच्या सुमारास हरकत अर्ज फेटाळत असल्याचा त्यांनी निर्णय दिला. मात्र या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती शिंगडा यांनी दिली आहे. त्यामुळे गावितांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.