पालघर - आज देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून पालघर, ग्रामीण रुग्णालय येथे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात कोरोनाकाळात महत्त्वाची भूमिका बजावणारे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सागर पाटील प्रथम लसीकरण करून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्ह्यात चार ठिकाणी कोरोना लसीकरण
जिल्ह्यात आज पालघर ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय जव्हार, उपजिल्हा रुग्णालय डहाणू , वसई-विरार महानगरपालिके साठी वरूण इंडस्ट्रीज अशा चार ठिकाणी लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. आज पहिल्या दिवशी एका केंद्रावर 100 कोरोना योध्यांना ही लस देण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यासाठी कोव्हिशिल्ड लसीचे 19 हजार 500 डोस प्राप्त झाले असून यामध्ये पहिल्या टप्प्यात जवळपास 16 हजार आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी, कोरोना योद्धांना लसीकरण केले जाणार आहे.