पालघर - जिल्ह्यातील धबधबे, गड, किल्ल्यांसारख्या पर्यटनस्थळांवरील धोक्याच्या ठिकाणी मनाई असतानासुद्धा पर्यटक धोकादायक ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. यासंबधीत प्रशासनाने मनाई आदेश जारी केले आहेत. मात्र, या ठिकाणी कोणतीच सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आलेली नाही.
जिल्ह्यातील धरण, धबधबे, गड, किल्ले आणि धोक्याच्या ठिकाणी जाण्यास, पाण्यात उतरण्यास, धबधब्याखाली बसण्यास, तसेच धोक्याच्या ठिकाणी सेल्फी घेण्यास 6 ऑगस्ट पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मनाई आदेश काढण्यात आले आहेत. तरीही या पर्यटन स्थळांवर पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. आणि धोक्याच्या ठिकाणी जाऊन मौजमजा करताना दिसत आहेत.
प्रशासनाकडून मनाई आदेश लागू केले असूनसुद्धा वान्द्री धरण प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पर्यटनस्थळी धोकादायक स्थितीत पाण्याच्या प्रवाहात पर्यटक मौजमजा करताना दिसत आहेत. या सर्व प्रकारावरून पर्यटकांकडून मनाई आदेशाकडे काना डोळा केला जात असल्याचे समोर आले आहे.