पालघर - नालासोपारा पश्चिम निळेमोरे गावात शनिवारी रात्री ११ वाजता सेना-भाजप युतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या गाड्या अडवून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. शर्मा मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रदीप शर्मा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर नालासोपारा पश्चिम येथे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गेले होते. मात्र, निळेमोरे गावात मोठ्या संख्येने मुंबई पासिंगच्या गाड्या आढळल्याने गावकऱ्यांना विचारपूस केली. त्यावेळी एका गाडीतून प्रदीप शर्मा पैसे वाटप करण्यासाठी फिरत आहेत, असे सांगण्यात आले. त्यानंतर गावकरी व बविआच्या कार्यकर्त्यांनी शर्मा यांच्या गाड्या अडवल्या. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षक व इतर लोकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. शर्मा यांच्या गाडीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी पैसे असल्याचा संशय आल्याने पोलिसांना गाडीची तपासणी करण्याचे बविआच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यानंतर प्रदीप शर्मा यांच्या अंगरक्षकांनी बविआच्या कार्यकर्त्यांवर हात उगारला, असल्याचा आरोप असल्याचे बविआचे माजी उपमहापौर उमेश नाईक यांनी सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी शर्मा यांच्या २ वाहनांच्या काचा फोडून आपला संताप व्यक्त केला.
हे वाचलं का? - किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा; 'त्या' वक्तव्याबाबत धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण
नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वसंत लब्दे यांनी यावेळी हस्तक्षेप केला आणि लाठीमार करत सर्व गाड्या पोलीस ठाण्यात नेतो, अशी धमकी दिली. तसेच शर्मा यांना नालासोपारा शहरातून बाहेर पळण्यास मदत केली असल्याचा आरोप नाईक यांनी केला. शर्मा यांच्या ड्रायव्हरनी त्याही परिस्थितीत गाडी भरधाव वेगाने वसईच्या दिशेने नेल्यामुळे त्यांच्या वाहनात खरोखरच पैसे होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हे वाचलं का? - वरळी मतदारसंघात चार कोटींची संशयास्पद रक्कम जप्त
पोलिसांनी प्रदीप शर्मा व त्यांच्या ताफ्यातील गाड्या सोडल्याची बातमी वसई-विरारमध्ये पसरली. यादरम्यान वसई सनसिटी परिसरात बविआच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव शर्मांच्या गाड्या अडवण्यासाठी जमा झाला होता. त्यावेळी पोलिसांनी दुसऱ्यांदा लाठीमार केली असल्याचा आरोप नाईक यांनी केला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. पालघर अधिक्षक गौरव सिंग व वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर जातीने घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत शर्मा यांच्या निवासस्थानी पहाटे उशिरापर्यंत जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते. अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.