पालघर - जिल्ह्यातील गड-किल्ल्यांच्या जतनासाठी झटणारी सह्याद्री मित्र संस्था आणि शिवमंदिर व्यवस्थापन यांच्यावतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भवानगडावर मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासाला उजाळा देत, दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमा) या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला, त्यामुळे हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी दीपोत्सवाला विशेष महत्व आहे.
पालघर तालुक्यातील भवानगड येथे हा दीपोत्सव रविवारी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कोरोना योद्ध्यांचादेखील यावेळी सन्मान करण्यात आला. भवानगडाची निर्मिती करणाऱ्या तब्बल दोन हजार ज्ञात-अज्ञात वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तब्बल दोन हजार दीप यावेळी लावण्यात आले. या दीपोत्सव सोहळ्यासाठी परिसरातील दुर्गप्रेमी आणि शिवभक्तांनी हजेरी लावली होती. नरवीर चिमाजी आप्पांच्या वसई मोहीमेवेळी भवानगड या किल्ल्याची दोनहजार मराठ्यांनी १७३८ मध्ये भर पावसात बांधणी केली होती. याच गडाच्या मदतीने मराठ्यांनी पोर्तुगीजांवर विजय मिळवला. त्यामुळे या गडावर दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे.
कोरोना योद्ध्यांचा सन्मान
संपूर्ण जगात कोरोना महामारीने थैमान घातले असून, मागील सात महिन्यांपासून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची परवा न करता आरोग्यसेवा देत आहेत. त्यामुळे यावेळी गडावर या कोरोना योद्ध्यांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. राजेश वरसाळे, सिद्धेश सावे, हिरेंद्र भोईर आणि सुप्रीत सावे यांना गौरवण्यात आले.