पालघर - नायगाव पूर्वेतील जूचंद्र परिसरात गटार बांधणे, उघाडीवरील कलव्हर्ट बांधणे, तलावात कारंजे बसविणे, यासह इतर कामांचे पालिकेने ठेकेदारांना कार्यादेश दिले आहेत. परंतु, वर्ष भराचा कालावधी उलटूनही या कामांना सुरवात झाली नाही. त्यामुळे, परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा - पोलीस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून हवालदाराची आत्महत्या, कारण अस्पष्ट
जूचंद्र परिसर हा प्रभाग क्रमांक १०५ व ११५ या दोन्ही प्रभागात येतो. या भागात गिरीजा म्हात्रे शाळा ते आनंद दिघे मार्ग स्मशानभूमी पर्यंत आरसीसी गटार बांधण्याचे काम मंजूर झाले आहे. परंतु, या कामाला सुरुवात झाली नसल्याने सांडपाणी निचरा होण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच अस्तित्वात असलेली गटारेही नादुरुस्त झाली आहेत. त्यामुळे, अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही कामे पूर्ण होत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नवीन उघाडीचे काम अर्धवट
तर, दुसरीकडे गावात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कैलास म्हात्रे यांच्या घरा शेजारीच पाणी निचरा होण्यासाठी नवीन उघाडी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु, ठेकेदाराने ते कामही अर्धवट अवस्थेत ठेवले. त्यामुळे, पावसाळ्यातील पाणी निचऱ्याचा प्रश्न गंभीर होऊन नागरिकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तसेच, या कामासाठी बंधाऱ्यावरील रस्ता वर्षभरापासून खोदून ठेवल्याने नागरिकांना व विशेषत: शाळेकरी विद्यार्थ्यांना १ ते २ किलोमीटरचा वळसा घालून ये-जा करावी लागत आहे.
जूचंद्र गावदेवी तलावातील कारंजाचे काम अद्याप अपूर्णच
जूचंद्र गावदेवी तलावाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात. या तलावाला आणखीन आकर्षक स्वरूप यावे यासाठी तलावात रंगीत कारंजे बसविण्यात येणार आहेत. परंतु, ते ही काम पूर्णत्वास गेले नाही. या विकासकामाच्या संदर्भात ठेकेदारांना कार्यादेश देऊन एक वर्षाचा कालावधी उलटून गेला, तरीही ही कामे पूर्ण झाली नसल्याने अडचणी वाढू लागल्या आहेत. पालिकेने या विकास कामांची दखल घेऊन लवकरात लवकर ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी माजी सभापती कन्हैया भोईर यांनी पालिकेकडे केली आहे.
..या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका
पालिकेने गटार व उघाडी बांधण्याचे काम ठेकेदार राठोर भाग्यजीत अँड कंपनीला दिले आहे. तर, गावदेवी तलावात रंगीत कारंजे बसविण्याचे काम भालेश्वर इंटरप्राईजेस च्या ठेकेदारांना दिले आहे. परंतु, या ठेकेदारांनी वर्ष उलटूनही कामे पूर्ण केली नाहीत. प्रशासनाचा संबंधित ठेकेदारांवर कोणताच वचक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, विकासकामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी माजी सभापती कन्हैया भोईर यांनी पालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : पालघरमधील 40 कोरोना योद्ध्यांचे दोन महिन्यांचे मानधन थकीत