पालघर - तालुक्यातील चहाडे परिसरातील वैतरणा खाडी पात्रात होणाऱ्या वाळू उत्खननावर सफाळेचे मंडळ अधिकारी वसंत बारवे यांनी तांदुळवाडी, लालठाणे आणि खडकोली रेती बंदरात धाड टाकून वाळू साठविण्यासाठी तयार केलेले खड्डे जेसीबी मशीनच्या साह्याने उद्ध्वस्त केले.
छापा टाकूत अवैध रेती उत्खननावर कारवाई
जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीला पेव फुटले आहे. समुद्र किनाऱ्यासह नदीपात्रात बेसुमार उत्खनन सुरू आहे. आठवडा भरापूर्वी मनोर मंडळ अधिकारी यांनी अवैध वाळू उत्खननावरच्या कारवाई केल्यानंतर लगेच ही कारवाई केली आहे. चहाडे हद्दीतील वैतरणा खाडी पात्रात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी सफाळे मंडळ अधिकारी वसंत बारवे यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तांदुळवाडी, लालठाणे आणि खडकोली रेती बंदरात छापा टाकला. यावेळी अवैधरित्या उत्खनन केलेली रेती साठवणुकीसाठी सिमेंटच्या रिकाम्या गोणी वापरून तात्पुरता स्वरूपात खड्डे तयार केल्याचे आढळून आले. त्यानंतर जेसीबी मशीनच्या साह्याने रेती साठवणुकीचे हे खड्डे नष्ट करण्यात आले.
वैतरणा खाडीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन
वैतरणा खाडी पात्रात मोठ्या प्रमाणात सक्शन पंपाच्या साह्याने वाळूचे उत्खनन केले जाते. वाळू माफियांनी वैतरणा खाडीचे किनारे मोठ्या प्रमाणात पोखरले आहेत. त्यामुळे खाडीचे पात्र रुंद झाले आहे. किनारे पोखरल्याने शेकडो एकर जमिनी खचल्या आहेत. यामुळे शेतजमिनी उद्ध्वस्त होत आहेत.