पालघर /विरार - वसई तालुक्यात दरदिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना ट्रस्टच्या आणि खासगी दवाखान्यांचा हलगर्जीपणा पुन्हा-पुन्हा समोर येत आहे. अर्नाळ्यातील मृत्यू पावलेल्या 58 वर्षीय प्रतिष्ठित रुग्णाच्या कोविड चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करणाऱ्या बंगली येथील कार्डिनल ग्रेशर्स हॉस्पिटलविरोधात वसई पोलीस ठाण्यात आणि त्या रुग्णाचे सुमारे पाचशेहून अधिक जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करणाऱ्या नातेवाईकांविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्नाळा येथील रिसॉर्ट व्यावसायिक असलेल्या 58 वर्षीय व्यक्तीस यकृत आणि श्वसनाच्या त्रासामुळे बंगलीच्या कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलमध्ये दि. 1 जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांच्या आग्रहाला बळी पडून हॉस्पिटल व्यवस्थापनाने मृतदेह कोविड चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा न करता पहाटे 3 वाजता त्यांच्या हवाली केला. अर्नाळा येथे सकाळी 10 वाजेच्या सुमारास या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील आणि लगतच्या गावातील मिळून सुमारे पाचशेहून अधिक नागरिक उपस्थित होते. त्यानंतर सुमारे 11.30 वाजता या रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल हाती पडला. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली.
याप्रकरणी वसई-विरार महापालिकेच्या सहायक आयुक्तांच्या तक्रारीवरून साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार कार्डिनल ग्रेशर्स हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाविरोधात वसई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह काही तासांसाठी शीतगृहात न ठेवता नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात दोष नेमका कुणाचा? याची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक आनंद पराड यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी आदेश असताना सुमारे पाचशेहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करणाऱ्या नातेवाईकांविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जबाबदार लोकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. दरम्यान, अंत्यसंस्कारात मृतदेहाच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या सुमारे 35 जणांना आतापर्यंत रुग्णाच्याच मालकीच्या रिसॉर्टमध्ये क्वारंटाईन करण्यात आले असून पाचव्या दिवशी त्यांचे चाचणीसाठी स्वॅब घेण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब जाधव यांनी दिली.