पालघर - जिल्ह्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून अनेक रुग्णांना बेड न मिळाल्याने जिल्ह्याबाहेर देखील उपचारासाठी जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालघर मधील जे.जे. वैद्यकीय आरोग्य पथकाच्या इमारतीत 50 खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. आमदार श्रीनिवास वनगा व जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
वाढत्या कोरोनामुळे कोविड सेंटरची निर्मिती -
पालघरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पालघर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना खाटा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या आरोग्य पथकाच्या इमारतीत कोरोना केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी आमदार राजेश पाटील, आमदार विनोद निकोले, आमदार श्रीनिवास वनगा यांनी लावून धरली होती. जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेत दहा दिवसात युद्धपातळीवर काम करून या इमारतीत 50 खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू केले. या याठिकाणी ऑक्सिजन बेडची व्यवस्थाही केली गेली आहे. या सेंटर शेजारीच ग्रामीण रुग्णालय असल्याने रुग्णांची फरफट थांबणार आहे. या केंद्राचे नियोजन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनकर गावित तसेच आरोग्य अधिकारी डॉ. उमेश डूम्पलवार, डॉ. पल्लवी उपलप व डॉ. सचिन नवले यांच्याकडे आहे. ग्रामीण रुग्णालयातील काही आरोग्य कर्मचारी या केंद्रांमध्ये रुग्णांची व्यवस्था पाहणार आहेत.
हेही वाचा - रायगडात रेमडेसिवीर इंजेक्शनची खराब बॅच; 90 रुग्णांना साईड इफेक्ट