पालघर - वसई विरारमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी शहरातील सर्व मासळी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र श्रावण महिना संपल्यामुळे शहरात मिळेल त्या जागेवर मासे विक्रेते विक्रीसाठी बसताना दिसत आहेत. अनेकदा सूचना करुनही मासे विक्रेते नियमांचे पालन करत नसल्याने महापालिकेच्या वतीने अशा विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे.
आज दुपारी विरार पश्चिम येथील न्यू विवा कॉलेज रोड वर मासे विक्रेतेसाठी मोठ्या प्रमाणात बसले होते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे महापालिकेचे कर्मचारी कारवाईसाठी गेले असता, मासे विक्रेत्यांची पळापळ झाली. मात्र मनपाचे कर्मचारी माघारी परतताच या मासेविक्रेत्यांनी आपले दुकान पुन्हा थाटले.