पालघर - वसई विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी यांनी कामचुकार २ सफाई कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. सोनू सरबटा व चंदू सोलंकी असे निलंबित करण्यात आलेल्या सफाई कामगारांची नावे आहेत. आयुक्तांनी केलेल्या या कारवाईमुळे कामचुकार कामगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
वसई विरार शहर महानगरपालिकेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी अलगीकरण, विलगीकरण केंद्र उभारली आहेत. शहरातील काही खाजगी रुग्णालयातील ठराविक बेड अधिग्रहित करून कोरोनाबाधित रुग्णांवर महानगरपालिके मार्फत उपचार केले जात आहेत. या केंद्रांमध्ये व रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी महानगरपालिकेच्या कायम सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक कऱण्यात आलेली आहे.
महानगरपालिकेने अधिग्रहित केलेल्या रिद्धी विनायक हॉस्पीटल, नालासोपारा (प.) या रुग्णालयात नेमणूक केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी कामचुकारपणा करत आहेत. रुग्णांची गैरसोय होत असल्याचे आयुक्त गंगाथरन यांच्या निदर्शनास आल्यामुळे रुग्णालयात नेमणूक केलेल्या सोनू सरबटा व चंदू सोलंकी या दोन कर्मचाऱ्यांवर त्यांना नेमून दिलेल्या कामात कामचुकारपणा केल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.