पालघर - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दापचरी येथे केमिकल ड्रम घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना घडली. तब्बल तासभर टेम्पोला आग लागल्याचा थरार भर रस्त्यात सुरू होता. यामुळे काहीकाळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या आगीत टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला असून अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत, या आगीवर नियंत्रण मिळविले.
टेम्पोला अचानक लागली आग
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबई येथून वापी केमिकल ड्रम घेऊन निघालेल्या टेम्पोला दापचरी येथे दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. टेम्पोला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने टेम्पो महामार्गावरून बाजूला उभा केला व टेम्पोतून वेळीच बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही संपूर्ण टेम्पो जाळून खाक झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने वाहतूक बंद केल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. काही वेळानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत टेम्पोला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले.
महामार्गावर देखील अग्निशामन दलाची व्यवस्था ठेवण्याची मागणी
महामार्गावर अनेक वेळा वाहनांना आग लागण्याचा घटना घडत असतात. परंतु महामार्गावरील आगीच्या घटनांमध्ये आग विझविण्यासाठी अग्निशामक व्यवस्था नसल्याने अनेक घटनांमध्ये निष्पाप लोकांचा बळी जातो. यामुळे महामार्गावरील आगीच्या घटना रोखण्यासाठी महामार्गावर अग्निशामक दल आयआरबी कंपनीतर्फे रुजू करण्यात यावे, अशी मागणी इतर चालकांनी केली आहे.