पालघर - सफाळे पोलीस ठाणे हद्दीत सर्व महत्त्वाच्या ३६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. जिल्ह्यात प्रथमच सफाळे बाजारपेठ परिसरात P-१, P-२ पार्किंग व्यवस्था राबवण्यात येणार आहे. याचे पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने सफाळे पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश केल्यापासून वाहने व नागरिकांवर नजर ठेवण्यात येणार आहे. हे सीसीटीव्ही लावण्याकरता सफाळा पोलीस ठाण्यातील प्रगती प्रतिष्ठान व सर्व व्यापारी वर्ग यांनी आर्थिक सहाय्य केले आहे. तसेच सफाळे बाजारपेठेत उद्भवणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून ग्रामपंचायत उंबरपाडा-सफाळे व सफाळे पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सफाळा पूर्व बाजारपेठेतील ओम टी सेंटर ते आराधना स्टोअर्स P-१ P-२ पार्किंगची संकल्पना राबविण्यात येत आहे. वाहनचालकांनी यापुढे बाजारपेठेत वाहने आणताना P-१, P-२ पार्किंग अंतर्गत निर्देशित केलेल्या नियमांचा कटाक्षाने अवलंब करावा. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
या उद्घाटन प्रसंगी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग, पोलीस उपविभागीय अधिकारी विकास नाईक, सफाळे सहायक पोलीस निरीक्षक संदीप सानप, सफाळे ग्रामपंचायत सरपंच आमोद जाधव, प्रविण राऊत, पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.