पालघर - तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कासा पोलिसांनी घोळ टोलनाका परिसरात कारवाई करत तंबाखूजन्य पदार्थ व टेम्पो असा एकूण ११ लाख ९२ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
टेम्पोमधून करण्यात येत होती वाहतूक
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टेम्पोमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कासा पोलिसांनी कारवाई केली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास घोळ टोलनाका परिसरात संशयित वाहनांची तपासणी करत असताना टेम्पो क्रमांक एम. एच. ४८ ए. वाय. ९५८३ या वाहनाची झडती केली असता, पोलिसांना तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.
पोलिसांनी या कारवाईत १ लाख २५ हजार ४०० रुपये किंमतीचे तंबाखूजन्य पदार्थ व टेम्पो असा असा एकूण ११ लाख ९२ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एका आरोपीला अटक
या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून कासा पोलीस ठाण्यात कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४सह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.